सप्रेम नमस्कार...
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हा आपल्या संस्कृतीचा अमोल ठेवा असल्यामुळे या सांस्कृतिक संपत्तीचे जतन करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न होत राहिले पाहिजेत. आज भारतीय माणसाच्या जीवनावर पाश्चात्त्य संस्कृतीचा इतका प्रचंड पगडा बसत चालला आहे की, मूळ भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये इतिहासजमा होतात की काय अशी काळजी वाटू लागते. मात्र श्रेष्ठ जीवनमूल्ये हरवून बसण्याच्या या युगातही शास्त्रीय संगीताची मोहिनी टिकून राहिली आहे, याचे कारण सर्व सामान्यांमध्ये असलेली आत्मियता. गायन-वादन-नर्तन या तिन्ही विभागांमध्ये कठोर साधना करून आपल्या कलागुणांच्या सामर्थ्यावर संगीताची अवीट गोडी संगीत रसिकांत निर्माण करणार्या कलाकारांचा यात सिंहाचा वाटा आहे. गुरू-शिष्य परंपरेने ही किमया पिढ्यान् पिढ्या पुढे सुरू राहिली आहे.
या थोर परंपरेची अल्पशी सेवा घडावी या हेतूने ’प्रबोधन गोरेगाव’ मुंबई फेस्टिवल चे आयोजन दर वर्षी करीत असते. पं. सुरेश तळवलकरांचे उत्तुंग व्यक्तिमत्व या उत्सवाची कमान वर्षामागून वर्षाला उंचावत नेत आहे. दर वर्षी संगीत जगतातील तेजस्वी तार्यांना एकत्र आणण्यात पंडितजी यशस्वी होतात. कलाकारांच्या कलाविष्काराचा रसिकांना मनमुराद कलानंद उपभोगता यावा हीच आयोजकांची मुंबई महोत्सवामागील भूमिका.
संगीत मैफिलींना आणखी काही उपक्रमांची जोड देखील दिल्यामुळे आनंद द्विगुणित होतो हे नि:संशय! उदा. दुर्मिळ वाद्यांचे प्रदर्शन, संगीतावरील दुर्लभ व उत्तमोत्तम पुस्तकांचे प्रदर्शन व संगीतप्रेमींच्या हृदयात अढळ स्थान असलेल्या कलाकारांच्य छायाचित्रांचे प्रदर्शन.
मुंबई फेस्टिव्हलची तयारी सुरु होताच संस्थेमध्ये व श्रोत्यांमध्ये उत्साहाचे वारे संचारते. सदर महोत्सवाचे यशस्वी आयोजन होण्यात अनेक उद्योगसमुह, जाहिरातदार, देणगीदार, स्टॉलधारक, वाहिन्या व श्रोतृवृंद यांची देखील मोलाची मदत होते.
संगीत जगतातील आनंद रसिकांपर्यंत आणणार्या मुंबई फेस्टीवलला आजतागायत मिळालेले यश असेच उत्तरोत्तर वाढत जावो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना!
‘मुंबई महोत्सव’ चे उदघाटन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील दिग्गज व सुप्रसिध्द गायिका श्रीमती गंगुबाई हनगल यांच्या ह्स्ते करण्यात आले. केंद्रिय ऊर्जामंत्री माननीय श्री. सुरेश प्रभू यांच्या शुभहस्ते प्रबोधनतर्फे प्रकाशित करण्यात येणार्या अत्यंत देखण्या व सुबक स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
‘मुंबई महोत्सव’ च्या पहिल्या दिवशी श्री. डी. के. दातार यांचे व्हायोलिन वादन, श्रीमती पद्मा तळवलकर यांचे गायन, सुप्रसिध्द बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन व संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे गायन यासारख्या महान कलाकरांच्या कलेचा आनंद रसिकांनी लुटला. तर दुसर्या दिवशी १४ एप्रिल २००१ रोजी पंडित सुरेश तळवलकर यांची तालयात्रा, पंडित उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायन, पंडित बिरजू महाराज यांचे कथ्थक नृत्य व गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सुश्राव्य गायन याचा आनंद रसिकांनी घेतला.
2002
मुंबई महोत्सव या मुंबईतच नव्हे, तर सर्वदूर पसरलेल्य संगीत तीर्थस्थानात ख्यातकीर्त झालेल्या हिंदुस्थानी अभिजात शास्त्रीय संगीताच्या आनंदयात्रेच्या द्वितीय वर्षाचे उद्घाटन, हिंदुस्थानी अभिजात संगीताला लाभलेल्या तेजस्वी बावनकशी व्यक्तिमत्व पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलनाच्या वेळी कलामंचावर गानतपस्विनी गंगुबाई हनगल, ताललयमेरू पंडित किशनमहाराज, नव्वद उनपाऊस पाहिलेले तरीही तारुण्याला लाजविणारी लवचीक चपळता अंगी असलेले गुरुश्रेष्ठ केलूचरण महापात्रही होते.
दोन दिवसांचा ’मुंबई महोत्सव’ च द्वितीय वर्षाचा सोहळ गानगंधर्वांनाही हेवा वाटावा अशा पद्धतीने सादर झाला. उद्घाटन समारंभानंतर गानतपस्विनी गंगुबाई हनगल यांनी आपल्या गानतपस्येने साध्यकेलेली गानसिद्धी सादर केली. श्रोते त्य भारावलेल्या अवस्थेत असतानाच प्रची महर्षी किंवा योगियांचे रूप व व्यक्तित्व असलेल्या पंडित किशन महाराजांनी मूक तबल्याल अक्षरश: बोलते केले. ताल आणि लय सजीव झाले. पहिल्या दिवशीचा समारोप पंडित भीमसेन जोशी यांच्य डीरगंभीर स्वर, सहज, लवचीक, अर्थवाही आलापी आणि अदाकारी ने झाला.
दुसर्या दिवशीच्या कार्यक्रमात पंडित राजन-साजन या बंधूंच्या खानदानी गायन - सहगायनाने या बंधूंचे घट्ट विणीचे आलाप दोन व्यक्तींचे दोन भिन्न स्वर आहेत हे मुळी वटत नाही, पटत नाही याची प्रचीती दिली. यानंतर नृत्यकलेचे एक वृद्ध तपस्वी गुरुश्रेष्ठ केलूचरण महापात्र यांच्या नृत्यातील सळसळत्या लवचिकतेने, त्यांच्या चेहर्यावरील बदलणर्या अभिनयनिपुण भाव पाहताना समस्त प्रेक्षकगण स्तब्ध होऊन गेले. सोहळ्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना संतुर वाद्याचे आद्य जादूगार पंडित शिवकुमार आणि तबलानवाज पंडित झाकिर हुसेन यांनी कलामंचाचासोबतच श्रोत्यांच्या भावविश्वाचा ताबा घेतला.
मुंबई महोत्सवाचा हा द्वितीय वर्षाचा सुरेख, सुरेल, मंत्रमुग्ध सोहळा संपला तेव्हा श्रवणतृप्तता लाभूनही श्रोते आणि स्वयंसेवक, प्रबोधनचे प्रांगण आणि आसमंत एकमेकाला आणि मुंबई महोत्सवाला म्हणत होते पुनरागमनायच!
राष्ट्रीय स्तरावरील संगीत कार्यक्रमाच्या वेळपत्रकातील ’मुंबई महोत्सव’ च्या दिनांक व वेळांची रसिकांनी आतुरतेने वाट पाहावी असेच स्वप्न पंडित सुरेश तळवलकर आणि प्रबोधनचे श्री. सुभाष देसाई यांनी पाहिले व यशस्वी करून दाखविले.
2003
तबलावादनात ज्यांना तालयोगी म्हणून ओळखले जाते, असे ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवळकर ह्यांच्या मोलच्या सहकार्याने हा संगीत महोत्सव सादर झाला. ग्वाल्हेर घराण्याची ज्येष्ठ गायिका श्रीमती मालिनी राजुरकर यांचे गायन मुंबई करांना जवळजवळ ५ ते ६ वर्षांनी ऐकायला मिळाले. त्यानंतर उस्ताद झाकिर हुसेन यांनी आपल्या जादुई तबला वादनाने हजारो रसिकांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले.
दुसर्या दिवशी संध्याकाळी विख्यात पं. विश्वमोहन भट्ट यांच्या मोहन वीणावादानाने. पं. सुरेश तळवळकरांचे शिष्य विजय घाटे यांनी विश्वमोहन भट्ट यांना तबल्याची सुरेख साथ दिली. यानंतर रंगमंचावर ज्येष्ठ ठुमरीसम्राज्ञी शोभा गुर्टू यांचे आगमन झाले, त्यांच्या ठुमरी ने हजारो रसिकांना बेभान केले त्यांना अनिष प्रधान आणि ज्येष्ठ संवादिनी वादक पं. पुरूषोत्तम वालावलकर यांनी साथसंगत केली.
रशीद आपल्या बुलंद आवाजाने प्रथम दर्शनीच रसिकांची मने जिकंली. तीन दिवस चाललेल्या या संगीत समारोहाची सांगता ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोदवादनाने झाली. उस्ताद अमजद अली खान यांनी सरोदवर अत्यंत प्राचीन असा ’ देस ’ राग सादर केला.
2004
दिल्ली घराण्यातील सुप्रसिध्द तबलावादक पंडित अनिंदो चटर्जी यांच्या एकल तबलावादनाने शानदार शुभारंभ झाला. पहिल्या दिवासाच्या सांगता करताना मेवाती घराण्याचे अध्वर्यू समजले जाणारे नामवंत गायक पंडित जसराज यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
दुसर्या दिवशी सुप्रसिध्द सतारवादक उस्ताद शाहिद परवेझ यांनी आपल्या जादुई सतारीतून सूरांची बरसात केली. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या जेष्ठ गायिका पंडिता वीणा सहस्त्रबुध्दे यांच्या सूरेल गायनाने हजारो रसिक अक्षरक्ष: बेभान झाले. मुंबई फेस्टिव्हलची सांगता जगप्रसिध्द बासरीवादक पंडित हरिप्रसाद यांच्या सुमधुर बासरी वादनाने झाला.
2005
पं. रोणू मुझुमदार यांच्या सुमधुर बासरी वादनाने महोत्सवाची सुरूवात झाली व त्याच दिवशी दुसर्या सत्रात बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाचा आनंद उपस्थित रसिकांनी घेतला.
महोत्सवाच्या दुसर्या दिवशी पहिल्या सत्रात मृदुंगवादक पं. भवानी शंकर, तबलावादक सत्यजित तळवलकर, पखवाजवादक श्रीधर पार्थसारथी व लोकप्रिय ड्रमर श्री. शिवमणी यांनी एकत्रित कार्यक्रम सादर केला. या महोत्सवाची सांगता पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाने झाली.
2006
उस्ताद शाहिद परवेझ यांच्या सतार वादनाने महोत्सवाची सुरवात झाली व त्याच दिवशी दुसर्या सत्रात पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या सुमधुर बासरी वादनाचा आंनद उपस्थितीत रसिकांनी घेतला.
महोत्सवाच्या दुसर्या दिवशी श्रीमती शमा भाटे यांच्या कथ्थक नृत्याचा कार्यक्रम झाला. तसेच पं. उल्हास कशाळकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला.
महोत्सवाच्या तिसर्या दिवशी पं. सुरेश तळवळर यांनी तबला वादनाचा कार्यक्रम सादर केला. पंडित जसराज यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला.