महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, रामदास इत्यादी अनेक संतांच्या पदरजाने ती पावन झालेली आहे. यातील प्रत्येक संताने आपली मुद्रा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील लोकांच्या मनावर उमटवलेली आहे. गेली अनेक शतके त्यांचे विचार, त्यांची शिकवण लोकांना आदर्शवत आणि अनुकरणीय वाटत आलेली आहे.
असे असले तरी इतर संतांच्या तुलनेत समर्थ रामदासस्वामींचा उदोउदो मात्र व्हावा तसा झालेला आपल्याला दिसत नाही. प्रपंच आणि परमार्थ यावर इतर संतांनी अधिक भर दिल्यामुळे ते सर्वसामान्य लोकांना अधिक जवळचे वाटले असावेत.
संतांच्या रत्नहारात समर्थ रामदास स्वामी या रत्नाचा रंग थोडा वेगळा होता. नाशिक येथे तपश्चरण पूर्ण केल्यानंतर त्यांनी तीर्थयात्रेला प्रारंभ केला. पण त्यांनी फ़क्त तीर्थयात्राच केल्या नाहीत तर गावोगावी फ़िरुन तत्कालीन परिस्थितीचा, समाजाचा, मोगलांकडुन असहाय लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचा अगदी जवळून अनुभव घेतला आणि अभ्यास केला. शक्ती आणि संघटनाअभावी देशात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे त्यांनी ओळखलं आणि जातील तिथल्या गावातल्या तरुणांना संघटित करुन त्यांना व्यायामाचं शस्त्रसज्जतेचं मह्त्त्व पटवून दिलं. शक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीची स्थापना केली. त्याच सुमारास किशोरवयापासूनच मोंगलांच्या विरोधात शड्डु ठोकुन उभा राहिलेल्या शिवबाराजाच्या सैन्यात सहभागी होऊन त्यांचे हात बळकट करण्याचा सल्ला तरुणांना त्यांनी दिला.
समर्थांनी समाजाला केवळ अध्यात्माची शिकवण दिली असं नाही, तर त्यांनी प्रजेला प्रजाधर्माची तर राजाला राजधर्माची शिकवण दिली. त्यांची शिकवण सर्वांगीण स्वरूपाची होती. त्या काळाच्या आवश्यकतेनुसार होती. सध्याच्या युगात ‘व्यवस्थापनगुरू’ या पदाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. समर्थ हे चारशे वर्षांपूर्वीचे ‘व्यवस्थापनगुरू’ होते असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही.
समर्थांचे विचार आणि दृष्टी आजच्या युगातसुद्धा उपयुक्त आहे. म्हणून काहीशा उपेक्षित असलेल्या समर्थ रामदासांची ओळख अधिकाधिक लोकांना व्हावी यासाठी प्रबोधनने दिनांक १४ ते १८ नोव्हेंबर २००७ या कालावधीत समर्थ उत्सवाचे आयोजन केले होते. यात एक भव्य प्रदर्शन, विविध स्पर्धा, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन प्रबोधन क्रिडा संकुलाच्या विस्तीर्ण पटांगणावर केले होते. या प्रदर्शनात समर्थांच्या पादुका, समर्थकालीन ऎतिहसिक स्थळांच्या प्रतिकृती, शस्त्रे, सज्जनगडावरिल तत्कालीन बाजारपेठ तसेच ऎतिहसिक व्यक्तींचे दर्शन इत्यादींचा समावेश होता. याच ठिकाणी समर्थांचे तसेच समर्थांवरिल साहित्यसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले होते.
समर्थ महोत्सवाच्या निमित्ताने त्यांची सम्रग ओळख व्हावी म्हणून आम्ही ‘ वसंतश्री ’ दिवाळी वार्षिकाचा श्री समर्थ रामदास जन्मोत्सव चतु:शताब्दी सोहळा विशेषांक अगदी आकर्षक स्वरूपात प्रकशित केला गेला. त्यासाठी आम्हाला अनेकांनी भरघोस मदत केली. शिवाय ‘ मनाचे श्लोक ’ ही पुस्तिका आणि ‘ समर्थ संस्कार ’ या पुस्तकाचे तसेच डॉ. सदा कऱ्हाडे यांनी लिहिलेल्या ‘ समर्थ रामदास ’ या पुस्तकाचे समयोचित प्रकाशन केले.
सदर भव्य-दिव्य आकर्षक समर्थ महोत्सवाचा मुख्य उद्देश समर्थांच्या जीवनाकडे, कार्याकडे लोकांची जिज्ञासू दृष्टी वळावी असा होता.
समर्थांच्या व्यक्तिमत्वाला, अध्यात्म, बलवर्धन, समाजकारण, राजकारण इत्यादी अनेक पैलू आहेत. यापैकी लोकांना त्यांचा कुठलाही एक पैलू जरी भावला व त्यांच्या मनात समर्थांबद्दलची जिज्ञासा उत्पन्न झाली तरी आमच्या श्रमांचे सार्थक होईल. |