| |
| |
| |
प्रबोधन गोरेगाव संस्था स्थापनेपासून ज्ञान, कला, क्रीडा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजसेवेच्या मार्गात वाटचाल करीत आहे. सुरूवातीपासूनच संस्थेने केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न करता समाजातील अनेक गोष्टी ज्या दुर्लक्षित राहिल्या आहेत त्यांकडे लक्ष पुरविण्यास सुरुवात केली. समाजाच्या अविकसित घटकाला उपयुक्त ठरणारा उपक्रम म्हणून १९७८ साली गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर जवाहर नगर (गोरेगाव पश्चिम) येथील झोपडपट्टी विभागात एक बालवाडी संस्थेच्या वतीने विनामुल्य सुरु केली. पहिल्याच वर्षी ३०-३५ बालकांना पूर्व प्राथमिक स्वरुपाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यात संस्था यशस्वी झाली. तद्नंतर समाज घडविण्याच्या कार्यातील एक महत्वाचे पाऊल म्हणजे ’प्रबोधन बालवाडी’ अशी या उपक्रमाची ओळख झाली.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा बांधवांसाठी करण्यात येणार्या कार्याचाच एक भाग म्हणून गोरेगाव पूर्व येथे कोयना नगर वसाहतीतदेखील बालवाडी सुरू करण्यात आली.
या बालवाड्यात २०० हून अधिक विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक दर्जेदार शिक्षण देण्यात येते. त्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे दाखलाही देण्यात येतो व दाखल्यावर विद्यार्थ्यांना गोरेगावातील कोणत्याही प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकतो. समाजसेवेची तळमळ व आवड असणार्या सौ. शालिनी वारेसे यांनी या बालवाड्यांच्या स्थापनेपासून अतिशय तळमळीने व सामाजिक जाणीव ठेवून शिस्तप्रिय विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले. या बालवाड्यांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पूढील शालेय जीवनात विशेष चमक दाखविल्याचे आढळून आले आहे. प्रतिवर्षी या बालवाड्यांसाठी सारस्वत बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध होते. संस्था त्याबद्दल सारस्वत बँकेची ऋणी आहे.
ज्ञानामुळे माणूस घडतो. ज्ञानामुळे घडलेला माणूस एक सशक्त व सुसंस्कृत समाज घडवितो. उमलत्या वयात होणारे संस्कार आयुष्याच्या वाटेवर शिदोरी म्हणून कामी येतात. झोपडपट्टीत राहणार्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी सुरु केलेल्या प्रबोधन गोरेगावच्या या उपक्रमास असेच उत्तरोत्तर यश मिळो हीच प्रार्थना!
- प्रबोधन गोरेगाव
|
|
|
|
|